सामाजिक

लेखक आणि कवी भेटतात तेव्हा…

 पंढरपूरला गेलं म्हणजे विठ्ठलाच्या भेटीइतकीच प्रा.डॉ.द.ता.भोसले सरांच्या भेटीचीही ओढ अनावर असते.पण गेल्या सहा वर्षात सरांची आणि माझी भेट झाली नव्हती.मागच्या वर्षभरात एकदोनदा पंढरपूर वरून आलो-गेलो पण समजलं की सर शेतावर राहायला गेलेले आहेत.असं धावतपळत त्यांच्याकडे जाता येणार नव्हतं.त्याआधीही दोन वर्ष कोरोनामुळे कुणीच कुणाला भेटू शकलं नव्हतं.त्याआधी एक दोनदा गेलो तर सर एकदा बाहेरगावी गेलेले होते आणि एकदा ते इतके आजारी होते की डॉक्टरांनी त्यांच्या भेटीगाठीवरही बंदी आणलेली होती.त्यामुळे मागची सहा वर्ष सरांच्या भेटीविनाच गेलेली होती. 
आता भेटलंच पाहिजे असा निश्चय करूनच यावेळी मी पंढरपूरला गेलो होतो.१७ ऑगस्टला सुधाकरपंत परिचारक यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त श्रीपुरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर माझं व्याख्यान ठरलेलं होतं.ती मंडळी मुक्कामाची व्यवस्था अकलूजला करतो म्हणाली होती.पण मी त्यांना सांगितलं,मला पंढरपुरात श्री.गजानन महाराजांच्या मठात राहायला आवडतं.त्यांनी तशी व्यवस्था केली.सुधाकरपंत विठ्ठलाचे सेवेकरीच असल्यामुळे विठ्ठलाचं सुलभ दर्शनही घडलं.आता ओढ होती ती भोसले सरांच्या भेटीची.आधी अंदाज घेतला की सर कुठे आहेत ? तर सर शेतातच होते. सरांचे मानसपुत्र म्हणजे माझे मानसबंधू कल्याणराव शिंदे यांना मी फोन करून कल्पना दिली की मी आलोय आणि आपणाला भोसले सरांच्या भेटीला जायचंय.ते पंढरपुरातच राहतात.त्यांनी सरांच्या नावाने एक सुंदर वाचनालयही सुरू केलेलं आहे. अलीकडेच त्यांनी भोसले सरांच्या भाषणांचं ‘संवाद स्रोत्यांशी’ हे पुस्तकही संपादित केलेलं आहे.ते पंढरपूरपासून जवळच एका खेड्यावर शिक्षक आहेत.आम्ही दोघांनी मिळून सरांना फोन लावला तर सर काही फोन उचलीत नव्हते.शेवटी कल्याणरावांनी सरांचे चिरंजीव डॉक्टर मुकुल भोसले यांना फोन केला. योगायोगाने ते सरांच्या जवळच होते.ते म्हणाले,सरांचं काही फोनकडं लक्ष नसतं,बऱ्याचदा तो बंदही असतो,मी सरांना फोन देतो तुम्ही त्यांच्याशी बोला.मी सरांना बोलू लागलो तर नेहमीप्रमाणे सरांनी सुरुवात केली,बोला कविराज ! नंतर नेहमीप्रमाणे थोडीफार चेष्टाही केली.शेवटी आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी दहा वाजता निवांत त्यांच्याकडं शेतावर जायचं.सोबती सोपानराव धुळगुंडे आणि मी दोघेही निवृत्त असल्यामुळे आम्हाला काही परतायची घाई नव्हती.सरांकडं भेटायला जायचं म्हणजे इथले प्रा.रमेश शिंदे आणि प्रा.राजाराम राठोडही हमखास माझ्यासोबत असतात.कारण पंढरपुरात आलो की या दोघांपैकी कोणाकडे तरी आम्ही सगळे जमतो. हातपाय धुवून,चाऊम्याऊ करून,सरांना फोनवर कल्पना देऊन आम्ही सगळे सरांकडं जातो.हा आमचा नेहमीचा रिवाज.पण आता परीक्षा सुरू असल्यामुळे हे दोघेही प्राध्यापक कामात गुंतलेले होते.त्यामुळे त्यांना येता येणार नव्हतं.वर्षानुवर्ष आम्ही त्यांच्या सरकारी डाकबंगल्याच्या शेजारी, हॉटेल नागालँडच्या पाठीमागं असलेल्या भोसले बंगल्यात जायचो.तिथं मी कितीदातरी सरांना भेटलोय.
 हा मोठा सुंदर बंगला आहे.पुष्कळ झाडझाडोरा लावलेला आहे.पण एक खतरनाक कुत्राही तिथं असतो.त्यामुळे आधी बेल वाजवून सरांची वाट पाहावी लागायची.मग सर येऊन कुत्र्याला पिंजऱ्यात कोंडत आणि आम्हाला बंगल्यात घेत असत.काहीतरी विनोद करत उभ्या-उभ्या उडी मारल्यासारखी त्यांची बोलण्याची लकब आधीच हसू निर्माण करीत असे.मग ‘मोठी माणसं आली बाबा आपणाला भेटायला’ म्हणून आमचं अति कौतुक करणं,भोसले बाईंना बोलावून काहीतरी फराळपाण्याचं सांगणं आणि निवांत भारतीय बैठकीवर बसून दोन भेटीच्या मधल्या काळातली सुखदुःख एकमेकांना सांगणं,हा आमचा नेहमीचा शिरस्ता.आज मात्र आम्ही त्या घरी जाणार नव्हतो. आता त्यांना भेटायला आम्ही शेतावर जाणार होतो. 
दुसऱ्या दिवशी दहा वाजता गजानन महाराजांच्या मठातला सात्विक आणि आरोग्यपूर्ण आहार घेऊन आम्ही तयार होतो.कल्याणराव आले आणि आम्ही निघालो.पंढरपूर पासून सहा किलोमीटर वर सातारा रोडवर,एक दोन किलोमीटर,आत असलेलं हे शेत. तिथं आम्ही पोचलो आणि हरखूनच गेलो.सरांच्या चिरंजीवांनी हे शेत अत्यंत चांगलं सजवलं आहे.एक सुंदर शेततळे,जुन्या चौसोपी वाड्याचा नवा अवतार वाटावा असं छान कवेलूचं घर,आजूबाजूला बारा एकर रानात ऊस,केळी,द्राक्षाच्या बागा, बंगल्याभोवतीही पुष्कळ झाडझाडोरा,अशा या बंगल्यात छान पैकी बाजेवर पहुडलेले सर,आम्हाला पाहिलं की धावत आले.विठ्ठलच भेटीला यावा भक्तांच्या तसे.मी त्यांच्या पायावर सपसेल लोटांगण घातलं.सरांनी उचलून कवेत घेतलं आणि आत नेलं. त्यांच्या आराम खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला.पण मनीमावूनं ती आधीच बळकावली होती.मग आम्ही सगळेच सरांच्या खाटेवर विसावलो.
 तोपर्यंत आमच्या संतोष चक्रधरांनी आम्हाला कॅमेऱ्यात पकडायला सुरुवात केली होती.हे सरांच्या लक्षात आल्यावर सर म्हणाले,मी चूळ भरून,कपडे बदलून येतो.सर आल्यावर मी आधी सगळं घर सरांना घेऊन फिरून पाहिलं.मी प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत होतो. स्थापत्यविशारदाचं नाव विचारत होतो.सरांनी त्यांच्या सुनबाई अंजली ताईंना बोलावलं.त्याही डॉक्टर आहेत.त्यांची एक मैत्रीण अभियंता आहे.तिने हे सगळं डिझाईन केल्याचं त्या सांगत होत्या.अगदी सगळीकडून भरपूर खिडक्या आणि मध्ये चारी बाजूनं सोपे असं सुंदर जुन्या वळणाचं,तरी सर्व दृष्टीने अद्ययावत,सुविधांनी सुसज्ज असे हे घर.या सुनबाई सरांची फार काळजी घेतात असं सगळेच सुरुवातीपासून सांगत होते.ते दिसतही होतं आणि बंगल्याच्या कानाकोपऱ्यातल्या मांडणीवरून सुनबाईंचा हात फिरल्याचंही लक्षात येत होतं. 
कोरोना सुरू झाल्या झाल्या,सरांचं वय पाहता,त्यांना सगळ्या संसर्गापासून दूर इथं आणून ठेवलं होतं. कारण पंढरपूर म्हणजे जगभरातून माणसं येणार.ती संसर्ग घेऊनच येणार.म्हणून त्यांच्या डॉक्टर चिरंजीवांनी ही दक्षता घेतली होती.हॉस्पिटल बंद करून डॉक्टर स्वतःही इथेच सहकुटुंब राहायला आले होते.इथलं हे घर तयार झाल्यावरही मी अनेकदा पंढरपुरात सरांना भेटलो होतो.तेव्हा प्रत्येक वेळी सर म्हणायचे आपण आमच्या शेतावर जाऊयात एकदा,मुक्कामी.तिथेच तुमच्या कविता ऐकूयात.मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही बोलवेल.
 खरंतर सरांनी अनेकदा पंढरपुरात माझे कार्यक्रम ठेवलेले आहेत.इथल्या कॉलेजला,इथल्या महिला मंडळात,डॉ.जयश्री भाकरे यांच्या ‘कोष’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी,सई मंडळात असा कितीदा तरी मी सरांच्या आग्रहावरून पंढरपुरात येऊन कविता वाचलेल्या आहेत. 
हे सगळं सुरू असताना अंजलीताईंनी चहाही केला होता.पुन्हा एकदा आम्ही सगळे खाटेवर बसलो. सरांनी त्यांच्या विहीणबाईंनाही बोलावलं.योगायोगाने अंजलीताईंच्या आई इथेच होत्या.त्याही मोठ्या प्रसुतीतज्ञ.लातूरात नावाजलेल्या.सरांचा डॉक्टर झालेला नातूही इथेच होता.कल्याणराव,सोपानराव, संतोष तर होतेच.सगळी मैफल जमून आल्यावर भोसले सर मला म्हणाले आता एखादी कविता म्हणाच.मी जन्म कविता म्हटली.कारण अंजलीताईंच्या आई प्रसुतीतज्ञ होत्या.त्यांचाच हा विषय.म्हणून मी ती कविता निवडली.किती हजाराव्यांदा मी ही कविता म्हणत होतो माहित नाही. पण भोवतीच्या माहोलानं मला इतकं उत्कट केलं होतं की जणू काही ही कविता मी प्रथमच म्हणतोय, असं मला वाटत होतं.
 मी सरांना लेखनवाचनाविषयी विचारलं.तर अंजलीताई म्हणाल्या गेल्या पाच सहा महिन्यापासून सगळं बंद आहे.पण आम्ही कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात इथं आलो तेव्हा सरांनी इतकं प्रचंड लिहिलं की,जवळजवळ पाच-सहा पुस्तकांच्या संहिता त्यांनी तयार केल्या.मग काही काळ शून्यावस्था येणे स्वाभाविकच होतं.तीही अवस्था जाईल आणि पुन्हा सगळं पूर्ववत होईल हे गृहीतच आहे.
 सरांनी विचारलं,आता इथून तुम्ही कुठे जाणार आहात ? मी म्हणालो,विठ्ठल मंदिरात.सर म्हणाले, मग मीही येतो,मला नेता का ? आम्ही आनंदाने नेण्याआणण्याची जबाबदारी स्वीकारली.आमच्याबरोबर सर मंदिरात आले.जणू काही प्रथमच मंदिरात आले अशा लहान मुलांच्या उत्सुकतेने मंदिरातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करत होते.आमचं दर्शन विशेष असल्यामुळे थोडावेळ रांग थांबवून आम्हाला दर्शन दिले गेले .एक विठ्ठल दुसऱ्या विठ्ठलाला भेटवण्याचं दुहेरी पुण्य आमच्या पदरी पडलं. 
सरांचा वानप्रस्थ हेवा वाटावा असा आहे.भोवती सगळ्या आप्तांचा गोतावळा,निसर्गाचा सहवास,तरी लोकवस्ती पासून दूर,निसर्गाच्या सानिध्यात सर राहतात.कोणाही कवीने स्वप्नात कल्पना करावी असा हा निसर्गवास.हाच सरांचा खऱ्या अर्थानं वानप्रस्थ आहे.
 नव्या पिढीच्या मुलांना द.ता.भोसले सरांचा फारसा परिचय नसेल.म्हणून शेवटी मी त्यांचा थोक्यात परिचय देतो.प्रा.डॉ.द.ता.भोसले यांचा जन्म १९३५ साली,पंढरपूर जवळच्या एका लहानशा खेड्यात, एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.सांगोला आणि परिसरातच त्यांचं बालपण गेलं आणि शिक्षणही झालं.पुढे ते रयत शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक झाले.नंतर प्राचार्यही झाले.आणि ३४ वर्ष नोकरी करून २७ वर्षांपूर्वी ते निवृत्ती झाले. त्यांचे वय सध्या ८७ वर्ष इतके आहे.सरांच्या तीन कादंबऱ्या,दहा कथासंग्रह,सहा ललितलेख संग्रह,तीन वैचारिक ग्रंथ,लोक संस्कृती वरील चार ग्रंथ,पाच समीक्षाग्रंथ,दोन चरित्र ग्रंथ.बारा संपादित ग्रंथ,म्हणी आणि बोलीचे पाच कोष,इतकं साहित्य प्रसिद्ध आहे.
 जुन्या शालेय पाठ्यपुस्तकात सरांचे पाठ नेहमीच अभ्यासाला असत.सर बालभारतीचे संपादकही होते. त्यांचं ‘पार आणि शिवार’ हे पुस्तक आमच्या वेळी अभ्यासाला होतं.ते मी पुढे प्राध्यापक झाल्यावर शिकवलं देखील.’सौंदर्य कुंज’ आणि ‘अपार्थीवाचे गाणे’ ही दोन पुस्तकं सर्वच विद्यापीठात,नेहमीच पदवीच्या अभ्यासाला असतात.लोक संस्कृतीच्या पाऊलखुणा हे सरांचं पुस्तक खूप गाजलं.त्याच्या अनेक आवृत्त्या झाल्या आणि त्याला सगळे पुरस्कारही मिळाले.त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद मॅकमिलन या जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला.सरांचं गाडगे बाबांवरचं पुस्तकही खूप गाजलं.ते सर्वदूर पोहोचलं.सरांचं वक्तृत्वही अत्यंत प्रभावी आहे.एकेकाळी ते महाराष्ट्रातले गाजलेले वक्ते होते.पंढरपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून २७ वर्षांपूर्वी सर निवृत्त झाले आणि पंढरपुरातच स्थायिक झाले.
 सरांनी माझ्यावर आणि माझ्या कवितेवर नेहमीच प्रेम केलं.माझ्यावर अनेकदा लिहिलं.अनेक ठिकाणी माझ्या नावाची शिफारस केली.इतकच नाही तर वेळोवेळी सतत माझ्या लिहिण्याला ते प्रोत्साहन देत राहिले.याच्यात्याच्याजवळ माझ्या लेखनाचं कौतुक करत राहिले.’गाव जिजाऊस आम्ही’ या माझ्या गीत मालिकेत जिजाऊ आणि संभाजी या आजीनातवाच्या संबंधावर गीत हवं असं सांगून,त्यांनी आवर्जून ते गीत माझ्याकडून लिहून घेतलं.ते पुढे अत्यंत लोकप्रियही झालं.  ग्रामीण साहित्य चळवळ सुरू करण्यातही सरांचा महत्त्वाचा वाटा होता.सुरुवातीच्या चळवळीच्या बिणीच्या शिलेदारांपैकी ते एक महत्त्वाचे शिलेदार होते.वैजापूरला झालेलं ग्रामीण आत्मकथन कौशल्य विकास शिबिर असो,की नेवासाला झालेलं ग्रामीण साहित्य संमेलन असो,या प्रत्येक ठिकाणी ग्रामीण साहित्याची आणि ग्रामीण साहित्य चळवळीची भूमिका मांडण्यात,अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात सर नेहमीच पुढाकार घेत असत. ग्रामीण साहित्य चळवळीची भूमिका मांडणारं त्यांचं एक पुस्तकही प्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *