भूमिका

आपल्याला सावित्रीच्या भिडेवाड्याचं “वेड” केव्हा लागणार ?

गेल्या दोन महिन्यांपासून मी पुण्यात मुक्कामी आहे.. एबी मराठीचं सगळं काम पंढरपूरच्या ऑफिसमधून चालत असल्याने तसा मी इथे बेरोजगारच आहे.. रोज सकाळी उठायचं, पेपर, सोशल मीडिया चाळायला, आणि पुण्यात असेल त्या कार्यक्रमाला हजेरी लावून मेंदूची मशागत करून घ्यायची, हा माझा आता नित्यनेम झाला आहे..

काल सोशल मीडियावर वाचलं की, पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विद्रोही साहित्य संमेलन आहे, आणि तिथे जेष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले आणि जेष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव येत आहेत.. हृदयमानव अशोक यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेल्या ‘Where is भिडेवाडा’ या लघुपटाचा ‘प्रीमियर शो’ सुद्धा यात होणार आहे, असं कळल्याने मी या कार्यक्रमाला गेलो..आयुष्यात पुण्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा भिडेवाड्याची अवस्था पाहून आतल्या आत रडवेला झालो होतो, त्यामुळे ‘Where is भिडेवाडा’ मध्ये नक्की काय मांडलय हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती..

सकाळच्या सत्रात प्रतिमा इंगोले यांना ऐकलं.. त्यांनतर अनेक वर्षातून तरुण कवींचं दर्जेदार कविसंमेलन ऐकता आलं याचं समाधान वाटलं.. दुपारच्या सत्रात ‘Where is भिडेवाडा’ या लघुपटाचा  प्रीमियर झाला.. आणि मी प्रचंड अस्वस्थता घेऊन सभागृहाच्या बाहेर पडलो..

‘भिडेवाडा’..

ज्या वास्तूमध्ये महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ती वास्तू आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.. आज कित्येक जणांना माहीतही नाही की ‘भिडेवाडा’ नक्की आहे कुठे..? शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात देशातल्या मुलींच्या  पहिल्या शाळेची एवढी दयनीय अवस्था असणे ही केवढी मोठी शोकांतिका आहे..?

हृदयमानव अशोक यांनी हा विषय अत्यंत पोटतिडकीने मांडला आहे.. या लघुपटासाठी निवडलेला विषय एवढा महत्वाचा आहे की, लघुपटाच्या इतर कोणत्याच तांत्रिक गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही.. यातील सर्व कलाकारांचा अभिनय,संगीत,आणि गीतलेखन कसदार झालं आहे.. या लघुपटाची सर्वात जमेची बाजू आहे संवादलेखन.. ०१ तास ०९ मिनिटांच्या या लघुपटात कुठलंही मनोरंजन नसताना सुद्धा ही कलाकृती आपल्याला निम्म्यातून सोडू वाटत नाही, हे या कलाकृतीचं आणि हृदयमानव अशोक यांच्या टीमचं यश आहे.

पुण्यातले काही तरुण-तरुणी एकत्र येत भिडेवाडा वाचला पाहिजे यासाठी जनआंदोलन ऊभारण्याच्या तयारीत असतात, मात्र सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कलाकार, राज्यकर्ते, वकील आणि इतर लोकांकडून त्यांना हवा तेवढा पाठिंबा मिळत नाही.. अनेक प्रयत्न करूनही समाजातील वेल एज्युकेटेड प्रस्थापित माणसं भिडेवाड्याच्या विषयातून सोयीस्कर अंग काढून घेतायत हे लक्षात आल्यानंतर ‘भिडेवाडा’ हा फक्त स्टंटबाजीचा विषय कसा करून ठेवला आहे.. याचं नेमकं चित्रण या लघुपटात मांडलं आहे..

पुण्यापासून लांबच्या अंतरावर असलेल्या एका खेड्यात गुरुजी मुलींना शिकवत असतात की, ‘आज तुम्ही फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिकू शकत आहात, त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली, म्हणून आज मुली डॉक्टर, इंजनियर होऊ शकल्या..”

यावेळी वर्गात बसलेल्या एका मुलीला या भिडेवाड्याबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण होते, आणि ०३ जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी भिडेवाड्यात येऊन भाषण करण्याची इच्छा ती तिच्या शिक्षकांपाशी व्यक्त करते.. भिडेवाडा म्हणजे काहीतरी मोठं प्रशस्त असेल, शेकडो व्यवस्थापक असतील, ते राष्ट्रीय स्मारक असेल, प्रचंड स्वच्छता असेल,देशातीलच काय तर जगभरातील हजारो माणसं रोज इथं भेट देत असतील, अशी भाबडी आशा ठेऊन ही मुलगी आणि तिचे शिक्षक पुण्यात पाय ठेवतात.. आणि त्यांना पुण्यात आलेले अनुभव आपल्या काळजात कालवाकालव करणारे आहेत..

गुरुजी आणि विद्यार्थिनी रस्त्यात प्रत्येकाला विचारात असतात, Where is भिडेवाडा ? भिडेवाडा कुठं आहे..? पण याचं उत्तर रस्त्यातला एकही माणूस देऊ शकत नाही.. तेव्हा आपण आपल्याला ‘साऊ’ची लेकरं म्हणवून घेतो, याची लाज वाटते.. ती भाबडी मुलगी दिवसभर भिडेवाडा शोधत असते, मात्र तिला त्याचा शोध लागत नाही.. आणि शेवटी ती हताश होऊन जाते.. 

तिचं हताशपण हे आपल्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे, याची जाणीव लघुपट पाहताना आपल्याला पुन्हा पुन्हा होत राहते..

हा प्रीमियर शो सुरू होण्यापूर्वी आकाश आप्पा सोनवणे यांचं भाषण ऐकलं होतं, त्यात त्यांनी सांगितलं की “मी पुण्यात १५ वर्षे रिक्षा चालवली आहे, या काळात मला पुण्यातली सगळी गल्ली-बोळं फिरता आली, रिक्षा घेऊन सगळीकडे जाऊन आलो, शनिवार वाडा,दगडूशेठ मंदिर,सारसबाग,केशरी वाड्यासोबत अनेक पेठांमध्ये गिऱ्हाईकांना नेऊन सोडलं.. पण माझ्या १५ वर्षांच्या काळात माझ्या रिक्षात बसलेला एकही माणूस “मला भिडेवाड्यात सोडा” असं म्हणाला नाही..

आकाश आप्पा सोनवणे यांनी मांडलेली ही खंत साधी नाहीये.. लोकांना भिडेवाडा माहीत नसणं, माहीत असेल तर त्याबद्दल आत्मीयता नसणं, आणि आत्मीयता असेल तर त्याबद्दल काही करण्याची  इच्छाशक्ती नसणं हे फार मोठं दुर्भाग्य आहे..

०१ जानेवारी १८४८ रोजी देशातली पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू झाली.. आज याला दीडशे वर्षांहूनचा काळ झाला.. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.. आजही करत आहेत.. मात्र त्यातून हाती काहीच लागत नाही.. राज्यकर्त्यांनी मनात आणलं तर त्यात अवघड काहीच नाही, मात्र त्यासाठी त्यांची इच्छाशक्ती असणं महत्वाचं आहे.. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसते तेव्हा लोकांनी जनआंदोलन उभारून असे विषय मार्गी लावायचे असतात, मात्र आपली लोकही सोयीस्कर याकडे दुर्लक्ष करत आहेत.. साऊंची जयंती,आणि पुण्यतिथी आली की आपल्याला भिडेवाडा आणि त्याची परिस्थिती आठवते, इतर वेळी मात्र आपण भिडेवाड्याकडे पाठ फिरवून समोरच्या दगडूशेठ गणपतीला हात जोडण्यात धन्यता मानतो..

आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.. हजारो लोकं आज साऊबद्दल बोलतील, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या सांगतील.. पण साऊंनी संघर्षाची मुहूर्तमेढ रोवलेला भिडेवाडा आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर नामशेष होतोय, त्याचं काय ? भिडेवाडा हे फक्त ठिकाण नाही, तर तो एक विचार आहे.. तो आपण जपला पाहिजे, अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत..

  • गणेश गायकवाड ( संपादक एबी मराठी न्यूज )

( हृदयमानव अशोक यांच्या ‘Where is भिडेवाडा’ या लघुपटाची लिंक इथे दिली आहे, अवश्य पहा..)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *