पर्यावरण,शिक्षण

  शाश्वत ग्रामीण विकासासाठी माती, पाणी व पर्यावरणाबाबत जागृती आवश्यक -पद्मश्री पोपटराव पवार. स्वेरीचा रौप्य वर्षारंभीचा विशेष कार्यक्रम थाटात संपन्न,  

पंढरपूर-

महाराष्ट्राला अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय  शैक्षणिक, कला व  क्रीडा यांची उज्ज्वल परंपरा लाभली असून अनेक मोठमोठी मंडळी पंढरपूरला आवर्जून भेट देतात. एखाद्या संस्थेचा विचार करताना त्या संस्थेच्या उभारणी मागचा हेतू फार महत्वाचा असतो. शिक्षणाला संस्कारांची जोड देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी देशात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि ते फार चांगले काम करत आहेत. स्वेरीची शैक्षणिक वाटचाल पाहिली तर असे लक्षात येते कि या संस्थेची स्थापना ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झाली आहे आणि एकूणच स्वेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होत आहे. आज एमपीएससी व यूपीएससी मध्ये यशस्वी होणारे ७०% विद्यार्थी हे इंजिनिअर्स आहेत. आजच्या तरुण पिढीवर मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.  आज निरोगी आणि निर्व्यसनी मुले ज्या घरात आहेत ते घर सध्या सर्वात श्रीमंत आहे. आज मानवाच्या अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासामुळे माती, पाणी आणि पर्यावरण यांचे संतुलन बिघडले आहे. ज्या देशाला पाण्याचा आणि मातीचा इतिहास नाही तो सिंगापूर देश आज  जगाला पाणी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यावर धडे देत आहे. त्यामुळे  ‘शाश्वत ग्रामीण विकासासाठी माती, पाणी व पर्यावरणाबाबत जागृती आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन कृषी व ग्रामविकासाचे उत्कृष्ट मॉडेल म्हणुन विश्वात प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजार (जि. अहमदनगर) चे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

आदर्श सरपंच पोपटराव पवार स्वेरी येथे मार्गदशन करताना…

          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील पदार्पणा निमित्ताने आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार हे ‘कृषी आधारित ग्रामविकासात युवकांचे योगदान व पाणी व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील ब्रिगेडीयर बोधेज् करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनील बोधे हे होते.

स्वेरीच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना पद्मश्री पोपटराव पवार , सोबत इतर मान्यवर, शेतकरी व विद्यार्थी

स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकातून स्वेरीच्या  सुरुवाती पासूनच्या वाटचालीतील महत्वाची टप्पे, आदरणीय स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी स्वेरीच्या स्थापनेवेळी दिलेला मूलमंत्र व त्यांचे योगदान, मिळालेली मानांकने, संशोधन निधी, विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या सोईसुविधा, कमवा आणि शिका योजना, प्लेसमेंट मधील गरुडझेप आदी महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *