महत्वाच्या घडामोडी

पैशासाठी मुलाने जन्मदात्या आईचेच संपवले जीवन…

प्रतिनिधी / कल्याण

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या एका बेरोजगार मुलानेच पैशासाठी आपल्या जन्मदात्या आईचाच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आईची हत्या केल्यानंतर ते लपवण्यासाठी त्या नराधम मुलाने आपल्या आईचा मृतदेह घराच्या छताला लटकवून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला आहे.. मात्र, आरोपी मुलाचा बनाव उघड करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे..

सरोजा पुमनी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.. तर, रवी पुमनी (वय – ३४ ) असे आरोपी मुलाचे नाव आहे.. रवी पुमनी याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो बेरोजगार होता.. आई सरोजा हिच्याकडे तो बाहेर उधळपट्टीसाठी नियमित पैशाची मागणी करायचा.. सतत पैसे देणे शक्य नसल्यामुळे आई सरोजाने त्याला नकार दिला की रवी याला तिचा राग येत होता..

मंगळवारी रात्री आई सरोजा आणि मुलगा रवी हे दोघे घरी असताना पुन्हा त्या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला.. या वादादरम्यान आईने पैसे देण्यास नकार दिल्याने रविला आईचा राग आला, आणि या रागातच रवीने आईशी भांडत तिला बेदम मारहाण केली.. त्यानंतर त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीने फास लावला आणि यातच आईचा जागीच मृत्यू झाला आहे..

हे प्रकरण आपल्या अंगलट येईल या भीतीने रवीने आईचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने घरातील पंख्याला लटकवून शेजाऱ्यांना आपण घरात आपल्या खोलीत झोपलो असताना नकळत आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.. या घटनेची कोळसेवाडी पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी मुलगा रवी याची सखोल चौकशी केली.. या चौकशीदरम्यान आपणच आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली रवीने दिली.. कोळसेवाडी पोलिसांनी रवी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *