महत्वाच्या घडामोडी

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवायला गेले वडिल, दोघांचाही दुर्दैवी अंत…

प्रतिनिधी / बीड

केज तालुक्यातील एकुरका येथील एका विहिरीत पडून एका बाप – लेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोनू उर्फ रोहन नटराज धस आणि नटराज रामहरी धस अशी मृत्यू झालेल्या या बाप – लेकाची नावे आहेत.

एकुरका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोथिच्या वर्गात रोहन शिकत होता. शाळा सुटल्यानंतर रोहन त्याचे वडील नटराज धस यांच्यासोबत शेतात गेला होता. रोहनला तहान लागल्याने शेतातच असलेल्या विहिरीत पाणी पिण्यासाठी रोहन उतरला असता त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला..

जवळच उभ्या असलेल्या त्याच्या वडिलांनी रोहन पाण्यात पडून गटांगळ्या खात असल्याचे पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. वडिलांना पाहून रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारली.. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले, विहिरीच्या आसपास दुसरे कोणीही नसल्यामुळे या घटनेची माहिती कोणालाही कळली नाही..

मात्र, ते दोघे रात्री उशिरापर्रायंत घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांची शोधा शोध सुरु झाली. शेतातील विहिरीत जावून पहिले असता, विहिरीच्या कडेला असलेली चप्पल आणि विहिरीत पडलेल्या चॉकलेट आणि चीप्सचा कागद दिसल्याने ते दोघे विहिरीत पडले असावेत असा अंदाज गावकऱ्यांना आला. परंतु त्यांचा काही शोध लागतं नव्हता..

त्यानंतर गावकऱ्यांनी पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला आणि एका व्यक्तीला बोलावून त्याच्या मदतीने गळ सोडून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले. यावेळी तिथे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश प्रचंड होता. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्र चौकीचे पोलीस जमादार अभिमान भालेराव, अशोक मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *