महत्वाच्या घडामोडी

पावसामुळे रस्त्यांची दाणादाण,

लोकप्रतिनिधीचे मूलभूत समस्येकडे दुर्लक्ष

माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमधील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांचा जीव मेटा कुटीला आला आहे. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संतप्त ग्रामस्थांमधून दिला आहे.

शेवते – पेहे रस्त्यावरील खड्डे आणि त्यात पावसाचे साठलेले पाणी.. यावरून खड्ड्यांचा अंदाज येऊ शकतो.


पंढरपूर तालुक्यातील विशेषतः भीमा नदी काठच्या गावांना जोडणाऱ्या एकाही रस्त्याची मागील 10 वर्षात साधी मलमपट्टी सुध्दा करण्यात आलेली नाही. फक्त मार्च अखेर आला की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. परिणामी भोसे परिसरातील भोसे – शेवते – पटवर्धन कुरोली, भोसे – खेडभोसे, शेवते – खेडभोसे, आवे – नांदोरे, नांदोरे – पेहे – करकंब, शेवते – पेहे, भोसे – नेमतवाडी, भोसे – मेंढापूर- रोपळे – येवती या रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे.

माढा विधानसभा मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील 42 गावे जोडल्यानंतर रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा पूर्ण होतील अशी आशा होती, त्यातही पाणी आणि विजेची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत, मात्र रस्त्यांची परिस्थिती जैसे – थे अशीच राहिली आहे.

शेवते – पेहे रस्त्यावरील खड्डे आणि त्यात पावसाचे साठलेले पाणी.. यावरून खड्ड्यांचा अंदाज येऊ शकतो.


लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्यांचा विसर पडल्यामुळे जिल्हा परिषदेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा मतदारसंघात दिसलेच नाहीत, त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्था बाबत खासदार महोदयांना कसे भांडावे, असा प्रश्न या भागातील मतदार, ग्रामस्थांना पडला आहे.

भोसे परिसरातील रस्त्यांना दुरुस्ती, डागडुजीचा मुहूर्त लागत नसला तरी 4 – 5 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्त्यांची कामेही अधिकारी आणि ठेकेदारांच्या हातमिळवणीमुळे रखडली आहेत. शेवते – देवडे, शेवते – पटवर्धन कुरोली, भोसे – मेंढापूर या रस्त्यांची कामे मागील 4 ते 5 वर्षांपासून सुरूच आहेत. ती कधी पूर्ण होतील याबाबत कोणीही माहिती देऊ शकत नाही.

पावसाळा संपल्यानंतर भोसे परिसरातील रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अनेक गावातील संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.

शेवते – पेहे रस्त्यावरील खड्डे आणि त्यात पावसाचे साठलेले पाणी.. यावरून खड्ड्यांचा अंदाज येऊ शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *