भूमिका

पंढरपूरच्या नेत्यांच्या भूमिका ‘षंढ’ झाल्या आहेत काय ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे काही नेते गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्ये करत महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करत आहेत..छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू,आंबेडकर यांसह कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल भाजपचे ‘वाचाळवीर’ सातत्याने अपशब्द वापरत असल्याने महाराष्ट्राची अस्मिता कमी होत असून, त्या निषेधार्त राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने, निषेध मोर्चे आणि ‘बंद’ पाळण्यात आले..

त्याच पार्श्वभूमीवर काल सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. व ‘आम्ही भारतीय लोक’ या संकल्पनेखाली शिंदे गट व भाजपा वगळता सर्व पक्ष व संघटना एकत्र आल्या होत्या.. याला पंढरपुरातील नागरिक व व्यापारी वर्गाने मोठा पाठिंबा दर्शवत हा बंद यशस्वी करून दाखवला..

मात्र स्वतःला बहुजनांचे नेते म्हणवुन घेणारे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके व कल्याण काळे या मोर्चात दिसले नाहीत.. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या घरी दुःखद घटना घडल्याने मोर्चात सहभागी होणं त्यांना उचित वाटलं नसावं, मात्र दिवसरात्र अभिजित पाटलांच्या मागेपुढे करणारे, आबांचे लाडके कार्यकर्ते देखील या मोर्चात सहभागी होऊ शकले नाहीत.. ते ज्या कारखान्याचं नेतृत्व करतात त्या कारखान्याच्या व्हाईस चेअरमनचे पती व ‘शिक्षणसम्राट’ डॉ.बी.पी.रोंगे यांनासुद्धा या मोर्चात सहभागी होण्यासाठी वेळ मिळाला नाही..

मा.आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे हे ‘भाजपच्या दावणी’चे असल्याने त्यांना  महामानवांच्या अस्मितेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वपूर्ण वाटणे साहजिक आहे.. शेवटी ‘महापुरुष मतदानापुरते वापरायचे असतात’ हे कळण्यापूरते आवताडे आणि परिचारक आता प्रगल्भ राजकारणी झाले आहेत..

परीचारकांच्या विरोधात प्रत्येकवेळी दंड थोपटत रस्त्यावर असणारे दिलीप  थोत्रे हे सुद्धा महापुरुषांच्या अवमानाबद्दल निषेध करायला रस्त्यावर उतरू शकले नाहीत..

मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने भाजपच्या वाचाळवीरांच्या विरोधात महामोर्चा काढला.. या मोर्चात ‘मविआ’ सरकारमधील सगळे नेते उपस्थित होते.. वयाची 85 ओलांडलेले शरद पवारही राज्याच्या अस्मितेसाठी भर ऊन्हात मोर्चात सामील होते,

मात्र पवार यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे पंढरपूरचे नेते,भालके आणि काळे राज्याच्या अस्मितेच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन बसले होते, हे शोधायला हवं..

लग्न समारंभ, उद्घाटने, एवढंच काय साध्या बारशाच्या कार्यक्रमालाही न चुकता हजेरी लावणाऱ्या पंढरपूरच्या नेत्यांचा भाजपच्या वाचाळवीरांना पाठिंबा आहे काय ? त्यांना त्यांचे म्हणणे मान्य आहे काय ? नसेल तर मग ते त्यांचा निषेध का करत नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावं..!

या नेत्यांशिवायही पंढरपूरचा कालचा बंद यशस्वी झाला.. मुळात तो कोणत्याही एका पक्षाचा किंवा संघटनेचा नव्हताच.. आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत सगळे कार्यकर्ते एकत्र आले होते, असं असतानाही या ‘भूमिका’हीन नेत्यांची ‘पळपुटी’ भूमिका पंढरपूरकरांना न रुचणारी आहे..

निवडणुका आल्या की, फुले शाहू आंबेडकर.. आणि निवडणूका संपल्या की आपल्या विचारांची पायमल्ली करत स्वार्थाचं राजकारण करणारी नेते मंडळी आता सर्वसामान्य बहुजन पोरांनी ओळखायला हवीत.. कारण मतांसाठी महापुरुषांचा वापर करणाऱ्या इथल्या पुढाऱ्यांच्या अस्मिता आता ‘षंढ’झाल्या आहेत..

गणेश गायकवाड

संपादक,एबी मराठी न्यूज.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *