महत्वाच्या घडामोडी

आईचे शिवणकाम व वडिलांच्या शेतातील कष्टाचे चीज झाले.. MPSC परीक्षा पास करत मुलगा झाला मोठा अधिकारी…

प्रतिनिधी / बीड

बीडमधील चोपनवाडी येथील सचिन व्यंकटी वनवे याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.. माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे आणि अधिकारी करायचे हे स्वप्न मनी बाळगत सचिनच्या आईने दिवसरात्र शिवणकाम तर वडिलांनी शेतात काबाडकष्ट केले.. या कष्टाचे आता चीज झाले आहे..

विशेष म्हणजे सचिनने कुठलाही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून हे यश मिळवले आहे.. सचिनची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली आहे.. सचिनचे वडील व्यंकटी वनवे हे शेतकरी आहेत.. शेती करत असताना आपल्या तीन मुलांना कसे शिकवायचे याचा विचार ते सतत करत होते..

मात्र त्यांची पत्नी शांता म्हणजेच सचिनची आई यांनी त्यांना साथ दिली.. आणि शेतीबरोबरच त्यांनी शिवणकाम करत संसाराला पाठबळ दिले.. अशा परिस्थिती सचिनचे चौथी पर्यंतचे शिक्षण चोपनवाडी येथे झाले..

परगावी शिक्षणासाठी जाण्याचा खर्च झेपत नसल्याने सचिनने पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण आपल्या मामाकडे वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयात घेतले.. मामांनी पुढे अभ्यासात हुशार व चानाक्ष असलेल्या सचिनला पुढील शिक्षणासाठी अहमदपूर येथे पाठवले..

सचिनने अहमदपूर येथे शिक्षण घेत असताना शिकवणी घेणे सुरु केले.. यातून तो स्वतःचा खर्च भागवू लागला.. बीएससी पदवी मिळाल्यानंतर सचिनने एमपीएससीचा अभ्यास सुरु केला.. तब्बल चार वर्षे अभ्यास करून सचिनने एमपीएससी परीक्षा पास होण्याचे स्वप्न साकार केले आहे..

सचिन एमपीएससी परीक्षेत पास झाला असून त्याची मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नेमणूक झाली आहे.. ही बातमी समजताच गावाने सचिनला अक्षरशः डोक्यावर घेतले.. डीजेच्या तालावर अख्खा गाव नाचू लागला.. सचिनला खांद्यावर घेऊन अख्खा गाव नाचू लागला हे पाहून सचिनच्या आई – वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले..

सचिनने आपल्या यशाचे श्रेय आई – वडिलांना देत असे म्हटले आहे की, मला आईचे शिवणकाम तर वडिलांचे शेतातील काबाडकष्ट समोर दिसत होते.. यातून प्रेरणा घेत मी अभ्यास केला.. आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हाच एकमेव ध्यास माझ्या मनी होता.. सर्वांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे असेही त्याने म्हटले आहे.. सचिनच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *