Uncategorized

मंगळवेढ्यात झालेलं साहित्य संमेलन की साहित्याचा बाजार ?

मंगळवेढा येथे ०२ व ०३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेकडून विभागीय साहित्य संमेलन पार पडलं..
मात्र हे संमेलन साहित्यिक चर्चेपेक्षा आयोजकांनी केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे जास्त चर्चेत आलं..

मुळात महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रातली एक अग्रगण्य व मातृ संस्था आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या खालोखाल विभागीय साहित्य संमेलनाला महत्व असते..
मात्र यावेळी मंगळवेढ्यात झालेल्या या विभागीय साहित्य संमेलनाची ना कुठे चर्चा झाली, ना गाजावाजा.. मंगळवेढा येथील सुज्ञ रसिकांनीही या साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली..

नगरपालिकेच्या एका बंद पडत आलेल्या गार्डनमध्ये विभागीय साहित्य संमेलन भरवून आयोजकांना नक्की साध्य काय करायचं होतं ?

मंगळवेढ्यात साहित्य संमेलनासाठी स्वागतासाठी ना कमानी होत्या, ना स्टेज होते.. साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा सोहळाच असतो, मात्र साधा मंडप टाकायची तसदीही आयोजकांनी घेतलेली दिसत नव्हती..
रसिकांना बसण्यासाठी समोर मांडलेल्या खुर्च्या मातीचा चिखल होऊन चिखलात रुतत होत्या..
निमंत्रक साहित्यिकांना श्रोत्यांच्या टाळ्यांपेक्षा तिथले डास जास्त चावले, असंही काही निमंत्रक साहित्यिक खाजगीत बोलून गेले..

साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नाव असलेल्या निमंत्रक कवी लेखकांनाही कार्यक्रम पत्रिका मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांची साहित्य संमेलनाच्या ठिकाणी येण्यासाठी तारांबळ उडाली..

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे हे संमेलन असल्याने निदान त्या विभागातील साहित्य परिषदेच्या शाखांना व साहित्यिकांना तरी निमंत्रण देणे आवश्यक होते.. मात्र तसे कोणतेही निमंत्रण दिले गेले नाही..

मंगळवेढा येथे मसापच्या दोन शाखा आहेत, त्यातील वाद या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला.. दामाजीनगर शाखेकडून मंगळवेढा शाखेलाही आमंत्रण दिलं गेलं नाही.. त्यामुळे मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध असलेल्या इंद्रजित घुले व शिवाजी सातपुते या साहित्यिकांनीही संमेलनाकडे पाठ फिरवली..

कोणतेही संमेलन लोकांपर्यंत पोहोचवण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी असते ती माध्यमांची.. मात्र मंगळवेढ्यातील राज्य दैनिकांच्या प्रतिनिधींनीही निमंत्रणाच्या कारणावरून याकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून आलं..

समोर कार्यक्रम सुरू असताना दोनही दिवस रसिकांच्या खुर्च्या मोकळ्या होत्या, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्य कार्यकारणीने या संमेलनाकडे पाठ फिरवली.. एवढंच काय उद्घाटनासाठी आलेले प्रा.मिलिंद जोशी व सुनीताराजे पवार यांनी सुद्धा नियोजनावर नाराज होत, संमेलनातून पळ काढला..

समारोपाच्या भाषणावेळी अभिजित पाटील व लक्ष्मणराव ढोबळे यांच्यात राजकीय वाद रंगला, भाषणे लांबली त्यामुळेही उपस्थित संमेलनाध्यक्ष व कवी वैतागलेले दिसून आले..

कार्यक्रम पत्रिका कोलमडली, ऐनवेळी कवी संमेलन थांबवून कलानृत्याचा कार्यक्रम मध्येच घेतल्याने कवी व संमेलनाध्यक्षही वैतागले..

त्यामुळे सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या फेसबुकवर जाहीर टीका केली, तर संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे यांनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली..

मात्र या ढिसाळ नियोजनावर इतर कोणतेही साहित्यिक व्यक्त झाले नाहीत..
विशेष म्हणजे या साहित्य संमेलनात परिसंवादाचा विषय होता, “साहित्यिक भूमिका का घेत नाहीत..”

साहित्यिकांनी साहित्यात चाललेल्या अशा साहित्य समेलनांच्या बाजारू वृत्तींच्या विरोधात आधी भूमिका घ्यायला पाहिजेत..

साहित्यिकच स्पष्टपणे न बोलता सत्य दडवत असतील तर ते लोकांचे प्रश्न घेऊन कसे उभे राहणार ? हा प्रश्न आहेच..
उदात्त,उदारता आणि वैश्विक व्यापकता व्यक्त करणारे साहित्यविश्वच आता संकोचीत होत चालले आहे काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *