भूमिका

गोपाळपुरच्या जनाबाईचं मंदिर ‘भोंदूबाबां’चा अड्डा झालाय…

परवा पंढरपूरवरून मंगळवेढ्याकडं जाताना फार दिवसानंतर गोपाळपुऱ्यात गेलो. मागे गेलो होतो त्याला आता जवळजवळ वीस वर्षे झाली. मंगळवेढ्याचे लक्ष्मणराव ढोबळे मंत्री होते तेव्हा प्रत्येक सव्वीस जानेवारीला कविता महोत्सव घ्यायचे. त्यासाठी नेहमीच मी मंगळवेढ्याला जायचो. त्याला आता वीस वर्षे झाली. मध्ये एकदोन वेळा मंगळवेढ्याला गेलो होतो, पण तो सोलापूर सांगली हायवे होता. पंढरपूरहुन मंगळवेढ्याला जाणं झालं नव्हतं. 

वीस वर्षानंतर पुन्हा एकदा उत्सुकतेने गोपाळपुऱ्यात गेलो आणि तिथला धार्मिक बीभत्सपणा पाहून मी अत्यंत दुःखी झालो. पूर्वी मी इथं यायचो तेव्हा ही जागा सुनसान होती. हा प्रचंड दगडी वाडा, आतली श्रीकृष्णाची आणि भीमक राजाची मंदिरं सुनसान असायची. काळ्याकरंद दगडातली ही प्रचंड इमारत मला तेव्हाही आकर्षून घेत असे. 

या दगडी इमारतीपेक्षाही मला जास्त आकर्षण होतं ते हा वाडा  जनाबाईच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो म्हणून. ही वास्तू पाहिल्यानंतर ती किती शतकापूर्वीची आहे याचा नेमका अंदाज मला तरी बांधता आला नाही. पण हा वाडा कदाचित उत्तर भारतातल्या एखाद्या मराठी संस्थानिकांना बांधलेला असावा. कारण पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या समोरच होळकर आणि शिंदे यांचे असेच काळ्याकरंद दगडाचे वाडे आहेत. आणि त्यात अशाच श्रीकृष्णांच्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यावरून मी असा अंदाज केला की हा एखाद्या संस्थानिकानं बांधलेला वाडा असावा. 

पण याचं गोपाळपुरा नाव हे दलित वस्तीसाठी असलेलं नाव आहे असं राजा ढाले यांनी त्यांच्या जनाबाईवर लिहिलेल्या निबंधात म्हटलेलं आहे. सांगली भागात पूर्वी ज्याला महारवाडा म्हटलं जायचं त्याला काही गावातून गोपाळपुरा असंही म्हटलं जायचं. त्यावरून जनाबाई पूर्वाश्रमीच्या महार जातीतील होत्या असाही निष्कर्ष राजा ढाले यांनी काढलेला आहे. 

मला जनाबाईच्या जातीशी काही देणंघेणं नाही. जनाबाई हे सुरुवातीपासून माझ्या आकर्षणाचं केंद्र राहिलेली आहे. एवढ्या जुन्या काळात, आठशे वर्षांपूर्वी, इतकं क्रांतिकारी साहित्य निर्माण करणारी स्त्री भारतीय समाजात इतरत्र होती का याचा शोध घ्यायला हवा. आज जेव्हा मी या गोपाळपुऱ्याच्या या सुंदर इमारतीला ठिगळ लावल्यासारखा, गोपाळपुरा ग्रामपंचायतचा प्रचंड मोठा स्वागत दरवाजा गोपाळपुऱ्याची सगळी शान घालवत होता. मूळ मंदिराचा अस्सल फोटो कुठूनही घेता येत नव्हता. पूर्वी जेव्हा हे मंदिर निर्मनुष्य, निखळ असायचा तेव्हा माझ्याजवळ कॅमेरा किंवा मोबाईल नव्हता आणि आज तशी स्थिती राहिलेली नाही. मी खूप हळहळलो. 

पूर्वी निर्मनुष्य असलेल्या पायऱ्यांवर आता कितीतरी भोंदू बाबांनी आपली दुकानं मांडून ठेवलेली आहेत. पत्रे, ताडपत्री, फाटक्या चिंध्यांची कापडं यांचे अडुसे करून हे भोंदू बाबा भक्तांना दरडावत त्यांच्याकडून दक्षिणा वसूल करत होते. मी जेव्हा डोळे वटारून त्यांच्याकडं पाहिलं आणि तुम्हाला या पायऱ्यावर बसण्याची परवानगी कुणी दिली असे विचारलं, तेव्हा त्यांनी हात जोडून पुढं चला असा निर्देश खुणेनेच केला. आत गेलो तर असेच भोंदू बाबा सगळ्या गोपाळपुऱ्याला घेरून राहिलेले दिसले. 

कुठं जनाईची वाकळ, कुठं गोपाळ कृष्णाचा पाळणा, कुठं वांझेला मूल देण्यासाठी करण्यात येणाऱ्या विधीचे फलक, हे सगळं पाहताना मी कळवळून गेलो. जनाबाईचा संसार म्हणून एका ओवरीमध्ये मांडून ठेवलेल्या अखंड दगडात घडवलेल्या उतरंडी, चूल, बोळके, काठवट हे सगळं दगडी सामान पूर्वीही इथं होतं. पण अर्थातच हे जनाबाईंच्या काळातलं नाही. या सगळ्या मंदिराभोवतीच्या ओवऱ्या पूर्वी प्रवाशांसाठी निवास म्हणून बांधलेल्या असाव्यात. तशा त्या प्रत्येकच तीर्थाच्या ठिकाणी असतात. त्या सगळ्या ओवऱ्यावर आता भोंदू बाबांनी कब्जा केलेला आहे आणि त्यात आपल्या भोंदूगिरीची दुकानं थाटलेली आहेत. ‘नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती’ असं म्हणणाऱ्या वारकरी परंपरेला न शोभणारं हे सगळं तिथं पाहून माझं मन उदासून गेलं. 

या सगळ्या गर्दीत मंदिराच्या पाठीमागं झाडणी घेऊन, अंगावर पांघरून घालून एक म्हातारी बसलेली दिसली. ती बहुदा भीक मागण्यासाठी बसलेली होती. पण केविलवाना चेहरा करून कुणापुढेही ती हात पसरत नव्हती. ती व्यावसायिक भिकारी नसावी. कुणी दिलं तर ठीक नाही दिलं तरी ती आपली बसून होती. तिच्याकडे पहात मी पुढे गेलो. आणि मला वाटलं या म्हातारीला बोलावं. कदाचित हीच खरी जणी असावी. म्हणून मी परत फिरून तिच्या जवळ जाऊन बसलो. मी जवळ जाऊन बसतात म्हातारी हसली. हसल्याबरोबर या सत्तरऐंशी वर्षाच्या म्हातारीचे शुभ्र कुंदकळ्यासारखे दात मला दिसले. तिने दाताच्या कवळ्या नक्कीच बसवलेल्या नसणार असं गृहीत धरून मी आश्चर्याने विचारलं, आजी अजून तुमचे दात इतके चांगले कसे ? आमचे पहा बरं अर्धे पडून गेले. आजी म्हणाल्या, तुम्ही चाकलीटी खाता, गुटका खाता म्हणून तुमचे दात पडतात. आम्ही काय बाबा, दोन टाईम भाकर खातो आन राखुंडीनं सकाळी एकदा दात घासतो, म्हणून आमचे दात नीट राहत्या. मला खूप हसू आलं आणि खरंही वाटलं. 

आजीला विचारलं, आजी हातात झाडू दिसतोय ? म्हणाल्या हो बाबा, साफसफाई करते इथली. म्हटलं मग आता अशा का बसल्यात ? म्हणाल्या दिलं कोणी चार पैसे तर घेण्यासाठी बसले. मी खिशातली शंभराची नोट काढली आणि आजीजवळ दिली. आजीला म्हटलं आजी मूलबाळ आहे का नाही ? म्हणाल्या, आहे की एक मुलगा. मी विचारलं काय करतो ? म्हणाल्या, हेच मंदिर झाडण्याचं काम करतो. पहाटंच येऊन झाडून जातो. म्हटलं त्याला पगार मिळत नाही का मग त्याचा ? म्हणाल्या, मिळतो थोडाफार. म्हटलं मग तुम्हाला सांभाळत नाही का ? म्हणायला सांभाळतो की, पण सगळा भार त्याच्यावर कशाला ? म्हणून मीही काही काम करते. दूधदुप्त, औषधपाणी लागतं, त्यासाठी लागतात पैसे. 

आजीला म्हटलं आजी आपला समाज कोणता ? आजी म्हणाल्या हरिजन. आजींनी महार किंवा बौद्ध हे दोन्ही शब्द उच्चारले नाहीत. आणखी खोलात जाण्याची मलाही गरज नव्हती. आजीला म्हटलं, आजी नाव काय तुमचं ? म्हणाल्या, केराबाई सरवर. मला ते नाव सगळ्या अर्थानं सार्थ वाटलं. कचरा काढणारी, केर काढणारी ती केराबाई. केराबाईत मला जणीच दिसायला लागली. कारण एकेकाळी जणी ही अशीच अलक्षित, उपेक्षित होती. पण तिनं तिची उपेक्षा करणाऱ्या सगळ्यांना बाजूला सारून प्रत्यक्ष देवाशीच संबंध निर्माण केले. तिला माहीत होतं की, तो एकदा वश झाला की त्याचे हे सगळे पुजारी आपोआप आपल्या मागे येतील. तीनं बरोबर नाक दाबून सगळ्यांचं तोंड उघडलं होतं. 

तीही जनाबाई पूर्वाश्रमीच्या या केराबाईच्याच समाजाची होती, असा निष्कर्ष राजा ढाले काढतात. भोवतीचा सगळा धर्माचा बीभत्स बाजार पाहून मला कुठंही क्षणभरही थांबावं वाटलं नाही. पण केराबाईजवळ बसल्यावर तिच्याशी सुरू असलेल्या गुजगोष्टी थांबवाव्यात आणि तिच्याजवळून उठाव असं वाटेचना. सतत तिच्या नावात, तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात, तिच्या कर्मात, मला जनाबाई दिसत होती. जनलोकातली सामान्य स्त्री जनी दिसत होती. 

इंद्रजीत भालेराव (सुप्रसिद्ध जेष्ठ कवी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *