Uncategorized

अभिजित पाटील हे वारकरी संप्रदायाचा विचार विसरले आहेत काय ?

तुमचा मुलगा दहावीत किंवा बारावीत पास होत नसेल तर काळजी करु नका ! महादेवाच्या मंदिरात जा, आणि दोन बेलाची पाने महादेवाच्या पिंडीला वहा.. तुमचा मुलगा न अभ्यास करताही पास होईल..
एवढंच काय ? तुम्हाला नोकरी लागत नसेल, तरीही चिंता करू नका. शंकराची पूजा करा..तुम्हाला नोकरी मिळून जाईल..
हे शब्द आहेत, पंडित प्रदीप मिश्रा यांचे..

हे सांगण्याचं कारण म्हणजे, हेच पंडित प्रदीप मिश्रा दिनांक २५ डिसेंबर पासून ३० डिसेंबर पर्यंत पंढरपुरात असणार आहेत. त्यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन अभिजित पाटील यांनी केले आहे..

अभिजित पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत.. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राष्ट्रवादी ही पुरोगामी विचारधारेवर चालते, फुले, शाहु,आंबेडकर यांच्या विचारांशी जवळीक असलेला पक्ष अशी राष्ट्रवादीची ओळख आहे..स्वतः शरद पवार अनेकवेळा स्वतःला पुरोगामीपणाची बिरुदावली लावून घेत असतात..
मग त्यांच्याच पक्षात असलेल्या अभिजित पाटील यांना शिवपुराण कथेचा, कर्मकांड व अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा कार्यक्रम पंढरपुरात आयोजित करून नक्की काय सिद्ध करायचं आहे ?

प्रदीप मिश्रा हे त्यांच्या कथेत फक्त कर्मकांड सांगून थांबत नाहीत तर ते उघडपणे ‘आपल्याला संविधान बदलायचं आहे’ असंही वक्तव्य करत आहेत..
संविधान बदलण्याची राष्ट्रवादीची आयडॉलॉजी आहे काय ? नसेल तर मग राष्ट्रवादीचे नेते अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांचे कार्यक्रम का राबवत आहेत ? हा संशोधनाचा विषय आहे..

पंढरपूर ही अध्यात्माची नगरी आहे.. अनेक संतांनी इथं हरीनामाचा गजर केला, समतेचा संदेश दिला.. सुधारणावादी व पुरोगामीपणाचा पाया पंढरपुरात रचला गेला..
ज्या संतांनी वारकरी संप्रदायात कधीही कर्मकांड व अंधश्रद्धांना थारा दिला नाही, अशा पंढरपुरात कर्मकांडाची बीजे रोवण्याचा हा प्रयत्न आहे काय ?

संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते अलीकडे संत गाडगेबाबा यांनी लोंकांना विवेकी विचार दिला..आपल्या अभंग, प्रवचन आणि कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं..
तुकारामांनी तर बुवाबाजीला उघडपणे आव्हाने दिली.. त्याच वारकरी संप्रदायाच्या भूमीत आता असले बुवा महाराज अविवेकाची भाषा बोलणार असतील तर ते वारकरी संप्रदायाला चालणार आहे काय ?

मुळात गेल्या काही वर्षांपासून निवडणुका आल्या की असले बाबा बुवा समोर येतात.. त्यांचे जाहीर कार्यक्रम होतात.. या कार्यक्रमातून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेता येते.. आणि देवा-धर्माच्या नावाखाली स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेता येते.. असा पायंडा आता महाराष्टारतील राजकारणात सुरू झाला आहे..

तुलनेने यापूर्वी भाजप पक्षातील लोकांचा हा प्रमुख अजेंडा असलेला पहायला मिळाला होता. त्यात बागेश्वर बाबा असतील किंवा आता हे पंडित प्रदीप मिश्रा.. या दोघांचे कार्यक्रम म्हणजे भाजपच्या विचारधारेच्या प्रचार आणि प्रसार करण्याचा एककलमी कार्यक्रम आहे..
मात्र अभिजित पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून पंढरपूरच्या सुधारणावादी चळवळींना धक्का देण्याचं काम केलं आहे..
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरावर परकीय आक्रमण होण्याच्या भीतीने श्री विठ्ठलाची मूर्ती अभिजित पाटील यांच्या पूर्वजांच्या वाड्यात सुरक्षित ठेवण्यात आली होती.. वारकरी संप्रदायाचा एवढा प्रगल्भ वारसा असणारे अभिजित पाटील वारकरी संप्रदायाची तत्वे विसरले आहेत काय ?

अभिजित पाटील यांची नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गावखेड्यातली पोरं शिकावी, अंधश्रद्धेच्या विळख्यातून त्यांची सुटका व्हावी, या साठीच रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली होती..
कर्मवीरांनी संपूर्ण आयुष्य विवेकाचा विचार दिला.. अभिजित आबांना कर्मवीरांचा विचार प्रिय आहे की ? कर्मकांडांना खतपाणी घालणाऱ्या प्रदीप मिश्रा यांचा विचार प्रिय आहे.. याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे..

विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी अभिजित पाटील यांनी पंढरपुरात अनेक चांगले कार्यक्रम राबवले आहेत. शिवपुत्र संभाजी सारखं महानाट्य असेल, किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला आदर्श शिंदे यांचा गीतांचा कार्यक्रम, शिवजयंती निमित्त घेतलेली व्याख्यानमाला ही पंढरपूरकरांच्या मेंदूत भर टाकणारी होती.. त्यांनी इथल्या सांस्कृतिक चळवळ उभारणीला बळ दिले आहेच, ते नाकारून चालणार नाही.. मात्र आपण जो वारसा सांगतो तो विवेकाचा आहे, सुधारणेचा आहे, विचारधारेशी फारकत घेऊन बुवा बाबांच्या अविवेकी कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजे भाजपचा अजेंडा राबवण्यासारखे आहे..

भाजप हे आजपर्यंत देव,मंदिरे आणि धर्माच्या नावाखाली राजकाकरण करत आले आहे.. त्यांच्या राजकरणाचा पायाच तो आहे.. आपली लोकं देवाच्या नावाखाली खूप मोठ्या संख्येने एकत्र जमतात, याचाच उपयोग करत भाजपने आपला मतदानाचा टक्का वाढवला आहे..
अभिजित पाटील हे सुद्धा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हेच करू पाहत आहेत..

धर्माच्या नावाखाली भाजपकडे असलेले मतदान स्वतःकडे घ्यायचे असेल तर आपणही धर्माच्या नावाखाली मतांचा हिशोब मांडला पाहिजे, हे गणित अभिजित पाटलांचे असू शकते.. भाजपला शह द्यायचा असेल तर त्यांचाच फॉर्म्युला वापरून धर्माच्या नावाखाली पडणाऱ्या मतांचे ध्रुवीकरण करायचे, आणि त्याचा वापर निवडणुकीत करायचा.. हा अभिजित पाटील यांचा या कार्यक्रमाच्या मागचा अजेंडा असू शकतो.. यात अभिजित पाटील यशस्वी होतीलही. मात्र या सगळ्यात पंढरपुरातील सुधारणावादी चळवळींना खीळ बसेल, कर्मकांड वाढीला लागेल, वारकरी संप्रदायाच्या भूमीत अंधश्रद्धा फोफावतील याला जबाबदार कोण ?

स्वतःच्या राजकरणासाठी अभिजित पाटलांनी इथल्या सांस्कृतिक चळवळींना,पुरोगामी व वारकरी सांप्रदयाच्या विचारांना मूठमाती देऊ नये.. ही अपेक्षा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *