रस्ता सोडून घरात घुसलेल्या ट्रकने तरुणीस चिरडले…
प्रतिनिधी / अर्धापूर
देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावरील पार्डी येथे सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने घरात घुसलेल्या भरधाव ट्रकने एका तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. वर्षा माणिकराव मदने (वय-२१ ) असे या मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.. वर्षा ही हुशार आणि होतकरू तरुणी होती.. वर्षा बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून ती खाजगी शिकवणी घेऊन घरखर्चालाही हातभार लावत होती.. वर्षाला बँकेत नोकरीसाठीही संधी उपलब्ध झाली होती..
सकाळी अचानक देळुब ते नांदेड रस्त्यावर एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला.. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या माणिकराव मदने यांच्या घरात घुसला.. घरात असलेली वर्षा ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.. जखमी अवस्थेतच तिला तात्काळ अर्धापूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.. वर्षा हिच्या अपघाती मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.. आणि परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..