महत्वाच्या घडामोडी

अस्थी विसर्जन करताना तरुण नदीत गेला वाहून

प्रतिनिधी \ सोलापूर

अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण सीना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे घडली आहे. सोलापूर येथील हनुमान नगर येथे राहणाऱ्या किशोर डिगाजी व्हटकर ( वय -२७ वर्षे ) यांच्या काकांचे निधन झाले होते. आपल्या काकांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी पाकणी येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावर किशोर गेला होता. यावेळी अस्थी विसर्जन करताना त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला.

त्याच्या आधारासाठी दोघांनी हात दिला पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. किशोरला पोहता ही येत नव्हते त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहत गेला. काही क्षणात तो दिसेनासा झाला आणि पाण्यात बुडाला.

किशोरला वाचविण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने किशोरचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर शोध मोहीमही थांबली आणि किशोर सीना नदीच्या पात्रात अदृश्य झाला. मंगळवारी सायंकाळी नदीतील एका खड्यात किशोरचा मृतदेह आढळला. तालुका पोलिसांनी मृतदेह ताबडतोब बाहेर काढून त्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *